शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:53 IST)

विषय भरकटवण्यासाठी संजय राऊतांकडून पत्रकार परिषदेचा घाट जातोय – किरीट सोमय्या

kirit-somaiya
शिवसेना नेते खासदार संजय राऊत उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. परंतु, त्यापूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर आणखी आरोप केले आहेत. उद्या पत्रकार परिषद घेणार आहात, तर आजच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत, विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट घातला जातोय, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
सोमवारी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि तपास यंत्रणांविरोधात दंड थोपटले आहेत. सर्वांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या आव्हानानंतर आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदा कसल्या घेता. सरकार तुमचंच आहे. थेट कारवाई करा. मला टाका ना जेलमध्ये, मी येतो बॅग भरून, असं सांगतानाच साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी केला आहे. मी मुद्द्यावरून हटणार नाही. जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. सर्वच त्यात सहभागी आहेत. त्यामुळे सर्वच घाबरले आहेत, असा दावाही सोमय्या यांनी केला.
सोमय्या म्हणाले, कोविड सेंटरमध्ये झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्यावर संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप उत्तरे दिली नाहीत. कोरोना काळात सरकारने जनतेच्या जिवाशी खेळ केला आहे. कोविड कंपनीत घोटाळा करून लोकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. कोविड सेंटरमधील घोटाळ्याचा विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट घातला जातोय, असा निशाणा सोमय्या यांनी साधला आहे. प्रत्येक पक्षाला पत्रकार परिषद घेण्याचा हक्क आहे. सोमय्यांनी गुन्हा केला असेल तर मी कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करणार. पण इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी कोणी तरी सकाळी उठून पाच पानी पत्र रिलीज करणार… ईडीने डेकोरेटरला बोलवलं डोक्यावर बंदूक ठेवली, असं सांगणार याला काही अर्थ नाही. ज्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली त्याला समोर आणलं पाहिजे. त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली पाहिजे. असे सोमैय्या म्हणाले.
सोमय्या यांनी राऊत यांच्यासह राज्य सरकारवरही यावेळी आरोप केले. राज्य सरकारकडून फौजदारी कायद्यात घोटाळा करण्यात आला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, फौजदारी कायद्यात राज्य सरकारकडून घोटाळा करण्यात आलाय. मी गुन्हा केला असेल तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे.