1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:41 IST)

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगली पेटवून राजकीय पोळ्या भाजण्याचे भाजपचे षडयंत्र : पटोले

अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? असा संतप्त सवाल करून भाजप नेत्यांचे सत्ता गेल्यापासूनचे वागणे विरोधी पक्षासारखे नाही महाराष्ट्र विरोधी पक्षासारखे आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, राज्यातील नांदेड, मालेगाव व अमरावती शहरात झालेले प्रकार हा चिंतेचा विषय असून राज्य सरकारने वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडून परिस्थिती चिघळवून धार्मिक विद्वेष कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वास्तविक पाहता महाराष्ट्र शांत रहावा यासाठी एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजपने पुढाकार घ्यायला हवा होता पण भाजपचे नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. भाजप नेत्यांची वक्तव्ये पाहता ते लोकांना दंगलीसाठी भडकावत असल्याचे दिसत असून ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, का महाराष्ट्र विरोधी पक्षाचे नेते आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे