भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली सुभाष घई, डॉ.काझी यांची भेट
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मोदी@९ अभियानाअंतर्गत प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांची सदिच्छा भेट घेतली. श्री.बावनकुळे यांनी या भेटीत श्री.घई व डॉ.काझी यांना मोदी सरकारने ९ वर्षांत केलेल्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या योजनांची माहिती दिली. तसेच मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाची माहिती पुस्तिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकेही भेट दिली.
श्री.सुभाष घई यांच्या भेटीवेळी भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय आदी उपस्थित होते. डॉ. काझी यांच्या भेटीवेळी अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, खजिनदार मोईन मियाजी, सरचिटणीस अकील हाफीज, प्रदेशाध्यक्षांचे माध्यम प्रमुख रघुनाथ पांडे, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन, मुंबई अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वसीम खान आदी उपस्थित होते.
Edited By- Ratnadeep Ranshoor