गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (09:35 IST)

भाजप अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवणार

ashok chouhan
भारतीय जनता पक्षात राज्यसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यातच इतर पक्षातून आलेल्या नेत्यांचे पुनर्वसन हाही पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न आहे. त्यातच आता भाजपमध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचे संकेत त्यांच्या पक्षप्रवेशावेळीच देवेंद्र फडणवीसांनी दिले. भाजप आता राज्यात चौथी जागाही लढवणार असल्याचे समजते. यामुळे काँग्रेसच्या कोट्यातील मते फुटण्याची शक्यता अधिक आहे.
 
महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत विजयासाठी 42 मतांचा कोटा असतो. काँग्रेसचे 44 आमदार आहेत. अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. आणखी एका काँग्रेस आमदाराने राजीनामा दिला तर महाराष्ट्रात काँग्रेसची जागा धोक्यात येऊ शकते. महाराष्ट्रातून काँग्रेस रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा आहे.

काँग्रेसचा डाव फसण्याची शक्यता
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांपैकी भाजप तीन, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा निवडून आणू शकते. भाजपने चौथा उमेदवार दिला तर काँग्रेसचा डाव फसण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण, हिरामन खोसकर, सुलभा खोडके, असलम शेख, आमीन पटेल यांनी 2022 मध्ये राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केले होते. तेव्हा त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor