बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (18:12 IST)

बहिणीच्या लग्नात भावाचा हृदय विकाराने मृत्यू

घरात लग्न म्हटले की वातावरणच वेगळे असते. आनंदानं घरातील प्रत्येक जण या मंगल कार्यात हौशीने सहभागी होतात. पण पुसद तालुक्यात श्रीरामपूर येथे बहिणीच्या लग्नाच्या समारंभात भावावर काळाने झडप घातली आणि या आनंदाच्या क्षणी शोकाकुल वातावरण झाले. या ठिकाणी लग्नात आलेल्या भावाचा बहिणीच्या हळदीच्या दिवशी हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. डॉ. सोनल अशोक जैस्वाल वय वर्ष 36 असे या मयत भावाचे नाव आहे.  

हे घडले आहे पुसदच्या जवळ असलेल्या श्रीरामपूर येथे. या ठिकाणी पायल मुन्ना जयस्वाल आणि यवतमाळ येथील शुभम जैस्वाल यांचे 7 एप्रिल रोजी लग्न होते. डॉ सोनल हे एका विमा कंपनीत व्यवस्थापक असून ते आपली चुलत बहीण पायलच्या लग्नासाठी कोल्हापूरहून कुटुंबासह आलेले होते.

बुधवारी हळदीच्या समारंभात सर्वजण आनंदानं सहभागी झालेले होते .डॉ. सोनल यांनी आपल्या बहिणीला साडीचोळीचा आहेर दिला नंतर एकाएकी डॉ.सोनल यांच्या छातीत कळ्या येऊ लागल्या. त्यांना तातडीने पुसदच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घरातील आनंद काहीच क्षणात शोकाकुल झाला.

आनंदावर विरजण पडले. अत्यन्त शोकाकुल वातावरणात डॉ. सोनल यांच्या बहिणीचा विवाह सोहळा गुरुवारी सायंकाळी पार पडला. बुधवारी डॉ. सोनल यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर गुरुवारी सकाळी पुसद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सोनल यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच महिन्याचा मुलगा, अविवाहित बहीण, दोन विवाहित बहिणी आणि काका असा परिवार आहे.