नाशकात तरुणाची निर्घृण हत्या ; संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात
नाशिक:- येथील पंचक गावातील युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून हत्येचे कारण समजले नाही.पोलिसांनी काही संशयित ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंचक गावातील ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (वय 30) हा युवक दि : 3 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मित्रा सोबत पार्टी करण्यासाठी घरून मांसाहारी जेवण बनवून दुचाकी वर गेला मात्र पुन्हा घरी आला नाही. याबाबत पत्नी, वडील व शेजारी यांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने पत्नी साधना ज्ञानेश्वर गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हरवल्या बाबत तक्रार दाखल केली.
त्याचा तपास सुरू असताना सोमवारी दुपारी पंचक गावातील सोमनाथ बोराडे हे आपल्या गायी-म्हशी घेऊन पंचक येथील मलनिसारण गोदावरी नदी किनारी जंगल भागात गेले असता, त्यांना उग्र वास येऊ लागल्याने गावकऱ्यांच्या मदतीने नाशिकरोड पोलिसांना कळविण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड,अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.तेव्हा एक मृतदेह पालापाचोळ्याने झाकून ठेवल्याचे लक्षात आले. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या छातीवर खोलवर जखमा दिसून आल्या चेहऱ्यावर सिमेंट टाकलेले आढळून आले.
मृतदेह सात ते आठ दिवसा पासून टाकून दिला असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह ज्ञानेश्वर गायकवाड याचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी काही संशयित तपासासाठी आणले असून लवकरच त्याचा उलगडा होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक वांजळे यांनी बोलून दाखवले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.
ज्ञानेश्वर गायकवाड हा युवक मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता त्याच्या पाश्चात वृद्ध वडील पत्नी आणि एक लहान बाळ आहे.