1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:17 IST)

आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोविड संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावण्याची केंद्राची महाराष्ट्राला सूचना

Center instructs Maharashtra to impose local restrictions to prevent covid infection during upcoming Dahihandi and Ganeshotsav
कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सूचना केली आहे.
 
राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचा सांगून त्याला दुजोरा दिला आहे त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राच्या अनुषंगाने केले आहे.
कोविडचा धोका अजून गेलेला नसल्याने हे उत्सव सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात अशी भीती आयसीएमआर आणि एनसीडीसीने यापूर्वी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढतोय असे लक्षात आले आहे, त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे असे केंद्रीय आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राने आणि देशानेही संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे त्यामुळे टेस्ट –ट्रेक-ट्रीट वर भर देणे तसेच कोविड संदर्भातील सर्व आरोग्याचे नियम याचे पालन कटाक्षाने होईल हे पाहणे गरजेचे आहे असेही या पत्रात म्हटले आहे.
 
मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांचे आवाहन
 राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचा सांगून त्याला दुजोरा दिला आहे.  आपण जनतेच्या जीवाला जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे यातून अधोरेखित होते आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी आरोग्याच्या नियमांचे कसोशीने पालन करणे गरजेचे आहे तसेच राज्य शासन वेळोवेळी यासंदर्भात ज्या सूचना देईल ते जनतेच्या हिताचेच असल्याने राजकीय, सामाजिक, आणि सर्व थरांतील लोकांनी कृपया सहकार्य करावे असे आवाहन परत एकदा केले आहे.
 
कोविडची टांगती तलवार आपल्यावर कायम आहे हे विसरू नका. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घ्या आणि एक आपण या कोविड काळात  एक जबाबदार नागरिक म्हणून कसे वागलात हे देशाला दाखवून द्या असेही ते म्हणतात.