रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (12:01 IST)

महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता

दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर शनिवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्रात पुढील किमान चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 
 
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 15 ते 18 नोव्हेंबर पर्यंत राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील किमान चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
 
 राज्यात अनेक ठिकाण ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या तिन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 नोव्हेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
 
मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील 4 दिवसांत पावसाची शक्यता आहे. पुणे, मुंबईसह राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. 
 
16 व 17 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुण्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.