नांदेडच्या बड्या नेत्यावर ईडीच्या कारवाईचे चंद्रकांतदादांचे संकेत
नांदेड: नांदेडमधील बड्या नेत्यावर ईडीची कारवाई होण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. पाटील यांचा संपूर्ण रोख काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडे असल्याची जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा तर निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं सांगत अशोक चव्हाण यांनी चंद्रकांतदादांच्या विधानाची खिल्लीच उडवली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर अशोक चव्हाण यांची मीडियाने प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी हे विधान केलं. चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? असा सवाल करत लोकशाहीत असे अपेक्षित नसल्याची खंत चव्हाण यांनी केली. निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन खळबळ माजवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला आहे. मात्र, यावर फारस भाष्य करणार नाही असे म्हणत हे सगळं राजकीय असल्याचे ते म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील हे देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. हा संवाद साधत असतानाच नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची किंवा आयकरची कारवाई होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. हा सवाल येताच चंद्रकांतदादा आधी हसले. त्यानंतर त्यांनी पॉझ घेतला आणि आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. मी काही तपास यंत्रणांचा अधिकारी नाही. त्यामुळे मला माहीत नाही. पण माझ्या हसण्यावरून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत नाही, असं सूचक विधान चंद्रकांतदादांनी केलं. चंद्रकांतदादांनी हे विधान करताना कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांचा संपूर्ण रोख अशोक चव्हाणांकडे असल्याने चव्हाणांची चौकशी होणार का? या चर्चेने जोर धरला आहे. काही महिन्यांपूर्वीच अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित दोन व्यापाऱ्यांवर ईडी आणि आयटीच्या रेड पडल्या होत्या. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या या विधानाने चव्हाणांच्या गळ्याचा फास आवळला जातोय का? असा सवाल केला जात आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, तर वंचित आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांच्यासह १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत.