नोकरी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक करणारा भामटा सायबर पोलिसांच्या हाती
जळगाव जिल्हयातील नोकरी डॉट कॉम या ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक करणा-या परप्रांतीय भामटा सायबर पोलिसांच्या हाती लागला आहे. बेरोजगारांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणा-या भामट्यास वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथून पोलिस उप निरिक्षक अंगद नेमाने व त्यांच्या सहका-यांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे.
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील बेरोजगार युवक सचिन संजय मराठे हा नोकरीच्या शोधात होता. नौकरी डॉट कॉम या वेबसाईटवर त्याने नोकरी मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. रजिस्ट्रेशन केल्यानंतर 22 ऑगस्ट 2018 ते 22 ऑक्टोबर 2018 या कालावधीत त्यास विविध मोबाईल क्रमांकावरुन कॉल आले. कॉल करणा-यांनी त्यांची नावे रविसिंग, करन भातपुर, संग्राम भालेराव, करन लुत्रा, अनुभुती तनेजा, अनिल सिंग व श्रेया अशी सांगीतली होती. सचिन मराठे यास एचडीएफसी बॅंकेत नोकरी मिळवून देण्याचे आमीष वेळोवेळी दाखवण्यात आले होते. त्यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन, ऑनलाईन मुलाखत, लॅपटॉप किट, प्रोसेसिंग फी अशा विविध कारणांसाठी सचिन मराठे याच्याकडून पंजाब नॅशनल बॅक व सिंध बॅकेत 93 हजार जमा करण्यास सांगण्यात आले. नोकरी मिळण्याच्या आशेने सचिन मराठे याने ती रक्कम बॅंक खात्यात जमा केली. रक्कम खात्यात जमा केल्यानंतर सचिन मराठे यास एचडीएफसी बॅंकेचे बनावट नियुक्ती पत्र पाठवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन मराठे याने सायबर पोलिस स्टेशनला धाव घेत रितसर तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीनुसार सायबर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 1/19 भा.द.वि. 420, 468, 471 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनिमय 66 (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.