मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 30 जुलै 2022 (15:55 IST)

कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे. आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली. ते शनिवारी (३० जुलै) नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.”
 
“राज्यपालांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खुलासा केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यपाल हे एक मोठं पद आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद असून ते राज्याचे एक प्रमुख व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या योगदानाची कुणालाही अवहेलना किंवा अवमान करता येणार नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.