शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (08:05 IST)

मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी, आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिकेचे कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत आज सह्याद्री राज्य अतिथीगृहात एक विशेष बैठक पार पडली.

या बैठकीत मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक बेस्टचे कर्मचारी यांना २२हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार #दिवाळी #बोनस म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस जाहीर झाल्याने यंदा त्यांची दिवाळी गोड होणार आहे.

'कोविडच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे' असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. या निर्णयाबद्दल आंनद व्यक्त करतानाच मुंबईकरांसाठी मनापासून काम करा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर,  महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी, उत्तम गाडे, अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Edited by  : Ratandeep Ranshoor