1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'हे' निर्णय घेतले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर तात्काळ कॅबिनेटची बैठक घेतली. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयांची माहिती दिली. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले, “अवकाळी पाऊस, दुष्काळाने हौदोस घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत केवळ फसव्या घोषणा झाल्या. मला घोषणांचा बाजार भरवायचा नाही. शेतकऱ्यांची आतापर्यंत फसवणूक झाली आहे. त्यांना कर्जमाफीची घोषणा झाल्यावर प्रमाणपत्र दिले, पण खात्यावर पैसे जमा केले नाही. मला शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत करायची नाही. आम्हाला शेतकऱ्यांना आनंद वाटेल असं काम करायचं आहे. त्यामुळे आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करुन त्यात किती मदत बाकी आहे हे तपासू. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठी मदत करु. येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची घोषणा करु.”उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत किल्ला संवर्धनाबाबत ठोस निर्णय घेतला. त्यांनी राजगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांची तरतुद करण्याची घोषणा केली. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. या आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय प्रलंबित होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले यांचे जतन करणे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संवर्धन करणे आवश्यक आहे. राज्यशासन त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील, असं मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केलं.