सोमवार, 27 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:57 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 23 जानेवारीला सत्कार

Chief Minister Uddhav Thackeray was honored on January 23
मनसेने येत्या 23 जानेवारी रोजी महाअधिवेशनाचे आयोजन केलेले असतानाच शिवसेनेनेही त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या निमित्ताने जल्लोष मेळाव्याचे आयोजन केले आहे. या जल्लोष मेळाव्याला 50 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शिवेसना आणि मनसेच्या शक्तीप्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
 
येत्या 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांचा बीकेसी मैदानावर जंगी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जल्लोष मेळावा असे या मेळावला नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसविण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिले होते. ते वचन त्यांनी पूर्ण केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील बड्या नेत्यांच्या हस्ते उद्धव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याला 50 हजारलोक येणार असून देशातील राजकीय नेते, उद्योजक आणि सिने कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार असल्याचे परिवहनंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले.
 
23 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल, असे सांगतानाच हा कार्यक्रम म्हणजे जल्लोष आणि वचनपूर्तीचा सोहळा असेल, असे अनिल परब म्हणाले. हे आयोजित केलेले शक्तीप्रदर्शन नसेल. शिवसेनेला शक्तीप्रदर्शन करण्याची कधीच गरज भासली नाही. शिवसेनेची शक्ती संपूर्ण देशाला माहीत आहे. उलट लोक या दिवसाची वाट पाहत होते. लाखोच्या संख्येने ते स्वतःहून या सोहळ्याला उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले. मनसेच्या अधिवेशनाला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. 
 
दरम्यान, 23 जानेवारी रोजीत मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्क्षतेखाली मनसेचे महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे काय बोलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचे लॉन्चिंग केले जाणार आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.