विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर, खात्याचा पदभार स्वीकारला
काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपद मिळूनही आवडीचं खातं न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित राहून आणि परवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनालाही अनुपस्थित राहून वडेट्टीवारांनी ती नाराजी जाहीर देखील केली होती. मात्र, आता त्यांची नाराजी दूर झाली असून त्यांनी आजच आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला असल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘आमचं खातं शिवसेनेकडे दाखवलं गेल्यामुळे नाराजी होती. पण ही चूक मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली. पक्षश्रेष्ठींकडून पुढे मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन मिळालं आहे’, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या विदय वडेट्टीवार यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली. या भेटीमध्ये झालेल्या चर्चेनंतरच त्यांची नाराजी दूर झाली असल्याचं स्पष्ट झालं.