1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (16:19 IST)

निर्बंध शिथिल करताच खरेदीसाठी नागरिकांची पिंपरी बाजारपेठेत गर्दी, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

Citizens flock
महानगरपालिकेने लॉकडाऊन निर्बंध शिथिल करताच खरेदीसाठी नागरिकांनी पिंपरी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच, रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी पहायला मिळाली. पालिकेने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवडमध्ये सर्व दुकाने सकाळी 7  ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार आहेत.
 
राज्यात लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र, सर्वत्र एकसारखे आदेश लागू न करता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अत्यावश्यक व इतर दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 
त्यामुळे नागरिकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती. भाजी मंडई, किरणा दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तसेच, रस्त्यावरही वाहनांची एकच गर्दी पहायला मिळाली. निर्बंध शिथिल होताच नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे चित्र आहे.
 
दरम्यान, पालिका हद्दीत सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार असली तरी दुपारी तीन नंतर वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही कारण नसताना बाहेर पडण्यास मनाई राहणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.