शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती आता एका क्लिकवर
शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी महाबनी डॉट इन वेबसाईट ही बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात आहे. तुमच्या घटनात्मक हक्काला घरबसल्या न्याय देतानाच शासन गतिशील, पारदर्शी आणि आणखी जबाबदार करणारी ही प्रक्रिया आहे. सामान्यातल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची हमी घेणाऱ्या या वेबसाईटचे (संकेतस्थळाचे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाला लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील एका शानदार सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा शुभारंभ झाला. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाबनी डॉट इन या वेबसाईटची सुरुवात त्यांच्या हस्ते करण्यात आली.
नागपूर जिल्हा प्रशासनाने पिक्सल स्टार्ट संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने सुरू केलेली ही वेबसाईट एका क्लिकवर सर्व शासकीय योजनांचा लाभ देणार आहे. या वेबसाईटचे कामकाज आजपासून सुरू झाले आहे. या वेबसाईटचे लोकार्पण करताना ते बोलत होते. 15 दिवसाच्या आत लाभार्थ्यांनी दिलेल्या अर्जावर कारवाईची अपेक्षा यामध्ये करण्यात आली आहे. हे काम पंधरा दिवसात झाले नाही तर याठिकाणी दप्तर दिरंगाई होत आहे हे लक्षात येईल. ही माहिती जिल्हाधिकारी व त्यांच्या मार्फत संबंधितांच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादेत प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळावा यासाठीची ही तांत्रिक बांधणी आहे.