शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (09:00 IST)

ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेजेस सुरू होणार

राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता कॉलेजेस देखील सुरू होणार आहे. येत्या २० ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेजेस सुरू होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. राज्यातील कॉलेजेस सुरू होणार असली तरी यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत.
 
सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कॉलेजेस २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली. यात विद्यार्थ्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं गरजेचं असणार आहे. तसंच वेगवेगळ्या जिल्ह्यात तेथील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन वेगवेगळी नियमावली असेल असंही सामंत यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांसाठी कॉलेजेसमध्ये विशेष लसीकरण मोहिम राबविण्याबाबतचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये उपस्थित राहता येणार नाही त्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय कॉलेजेसनी करावी, अशा सूचना सामंत यांनी केली आहे. कॉलेजचे वर्ग ५० टक्क्यांपेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कॉलेजेस सुरू ठेवायची की नाहीत हा सर्वस्वी अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असणार आहे. विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं नसेल तर कॉलेजेसनी लसीकरण मोहिम राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक या सर्वांचं लसीकरण पूर्ण झालेलं गरजेचं आहे.