बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:05 IST)

कामं पूर्ण करा अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करु; गडकरींचा अधिकाऱ्यांना तंबी

आठ दिवसांमध्ये कामं पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी तंबी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. एमएसएमई सेक्टर मध्ये लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
एमएसएमई सेक्टरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लघु उद्याेग भारतीच्या कार्यक्रमाला गडकरी उपस्थित हाेते. यावेळी आपण अधिकाऱ्यांनी काम न केल्यास त्यांची लाेकांना सांगून धुलाई करु अशी तंबी दिल्याचे सांगितले. गडकरी म्हणाले, आज मी परिवहन कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीला परिवहन आयुक्तही उपस्थित होते. यावेळी मी त्यांना म्हंटलं की तुम्ही आठ दिवसांच्या आत लोकांच्या समस्या सोडवा अन्यथा लोकांना कायदा हातात घ्यायला सांगून तुमची धुलाई करायला सांगेन. जी व्यवस्था न्याय देत नाही तिला आपण फेकून द्यायला हवं असं आपल्या शिक्षकांनी शिकवल्याचेही गडकरी पुढे म्हणाले. आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. मी त्यांना सांगू इच्छीतो की तुम्ही सरकारी नोकर आहात आणि मी लोकांमधून निवडून आलोय. त्यामुळे मी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चोरी करत असाल तर मी तुम्हाला एक चोर म्हणेन. उद्याजकांनी कोणतीही भीती मनात न ठेवता व्यवसाय करा, अधिकारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत असंही गडकरी पुढे म्हणाले.