शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:01 IST)

राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्धाटन

राजभवनात 2016 साली भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने संग्रहालय तयार करण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्धाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास 15 हजार चौरस फूट परिसरात असलेल्या राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आलं असून ते लवकरच सर्वसामन्यांसाठी खुले केले जाणार आहे.
 
तीन वर्षांपूर्वी राज भवनातील हिरवळीखाली भव्य ब्रिटीश कालीन बंकर असल्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांना आढळले. त्यानंतर लगेचच राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह बंकरची पाहणी करून त्याचे जतन करण्याचे आदेश दिले होते.
     
अनेक दशके या बंकरची वास्तू बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होती तसेच सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने कमजोर झाली होती. ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच तिचे वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे तसेच लोकांना वास्तू पाहण्याची संधी देणे आवश्यक होते.
  
या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. त्यानंतर बंकरमध्ये आभासी वास्तवदर्शी संग्रहालय करण्याचे ठरविण्यात आले. या बंकरमध्ये विविध आकारांचे 13 कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला 20 फूट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतारा (Ramp) आहे. 
 
बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुध्द हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा (Lamp Recess) ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना त्यातील सर्व मूळ वैशिष्टे जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे. 
 
बंकरमध्ये आभासी वास्तव दर्शविणारे कक्ष तयार करण्यात आले असून त्यातून अभ्यागतांना तोफ चालविण्याचा आभासी अनुभव घेता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच राजभवनाचा इतिहास देखील या ठिकाणी पाहता येणार आहे. तोफांच्या प्रतिकृती व त्रिमितीय जवानांच्या आकृती देखील याठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.