1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (08:45 IST)

भाजप-मनसे युतीसाठी शुभेच्छा - खासदार सुप्रिया सुळे

मनसे आणि भाजप यांचे सूत जुळणार, अशी सर्वत्र चर्चा होत आहे, चर्चा ही होतच राहणार, कोणी कोणासोबत युती करायची, हा त्या- त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे.भविष्यात जर त्यांची युती झाली तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर कार्यालयात खासदार सुळे यांनी कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता काम करणार्‍या कोरोना योध्दयांना राखी बांधून आपुलकीची भावना व्यक्त करून, त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आले होते.
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर व अन्य उपस्थित होते. यावेळी कोरोना योध्दयांनी कोरोनाकाळात केलेल्या कामांचे अनुभव, आलेल्या समस्या, यावर कशाप्रकारे मात केली याचे अनुभव सांगितले.
 
बालसंगोपनाच्या वाढीव निधीबाबत लवकरच चांगला निर्णय…
महाविकास आघाडीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार बालसंगोपनासाठीचा निधी वाढवत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना यशोमती ठाकूर यांनी वाढीव निधीची मागणी केली आहे. सरकारची तिजोरी आणि पैशांचे मॅनेजमेंट बघून चांगलाच निर्णय होईल.
 
कोरोनाने माणसांत माणुसकी जागवली
कोरोना काळापूर्वी माणुसकी हरवत चालल्याच्या अनेक घटना पहायला मिळत होत्या. मात्र, कोरोनाकाळात लोकांनी एकमेकांना केलेल्या मदतीमुळे माणुसकीचे दर्शन घडले. तसे पाहिले तर कोरोनानेच माणसा-माणसांत माणुसकी जागविण्याचे मोठे काम केले आहे. असेही म्हणावे लागेल, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
 
पारनेर तहसीलदार प्रकरणी माझा प्रशासनावर विश्वास…
पारनेर महिला तहसीलदार प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या, एखादी महिलेची क्लिप व्हायरल होत असेल. तसेच, कोणत्याही महिलेचा जेव्हा विषय येत असेल तर त्याचा प्रथमत: संवेदनशील विचार केला गेला पाहिजे. त्यांची प्रायव्हसी जपली गेली पाहिजे. माझा प्रशासनावर भरोसा आहे. त्यांच्यावर होणारे आरोप आणि मला प्रशासनाकडून मिळालेली माहिती यात खूपच फरक आहे.