मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:56 IST)

नाना पटोलेंचा दिलदारपणा; चिमुकलीला मुंबईतील उपचारासाठी दिले स्वत;चे हेलिकॉप्टर

nana patole
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले हेलिकॉप्टर एका चिमुकलीला मुंबई प्रवासासाठी दिल्याची घटना घडली आहे. या हृदयविकाराने त्रस्त असलेल्या झोपडपट्टीतील एका चार वर्षाच्या मुलीला वैद्यकीय उपचारासाठी तिच्या आई-वडिलांसह मुंबईला पाठवायचे होते. यासाठी अडचण येत होती. यासंबंधित समस्या कुटूंबियांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली होती. यावर शिंदे यांनी पटोले यांच्याशी बातचीत करून हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले.
 
अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील सुनील नगरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या तुकाराम दासी या श्रमिकाची मुलगी उंजल ही जन्मतःच हृदयविकाराने त्रस्त आहे. दासी कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. तिच्यावर मुंबईत वैद्यकीय उपचार होण्याची गरज निर्माण झाली होती. वैद्यकीय उपचार आर्थिकदृष्ट्या झेपत नसल्यामुळे दासी कुटुंबीयांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे  यांची नुकतीच भेट घेऊन मदत मागितली होती. त्याप्रमाणे दासी कुटुंबीयांना आधार देत, लहानग्या उंजल हिच्या हृदयविकारावर मुंबईत वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे आमदार शिंदे  यांनी नियोजन केले होते. योगायोगाने रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  हे हेलिकॉप्टरने सोलापुरात दाखल झाले होते. पक्ष कार्यकर्त्यांसह भटक्या विमुक्त जाती जमाती समाजाच्या मेळाव्यासाठी पटोले यांना सोलापुरात येण्यास दुपारनंतर दोन तास उशीर झाला. त्यामुळे त्यांनी पुढील कार्यक्रमात बदल करून रात्री रेल्वेने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हेलिकॉप्टर रिकामेच परतणार होते.तेव्हा आमदार प्रणिती शिंदे  यांनी चिमुकल्या उंजल हिच्यावरील उपचारासाठी तिला आई-वडिलांसह याच हेलिकॉप्टरने मुंबईला पाठविण्याची विनंती पटोले यांना केली. पटोले यांनीही तात्काळ प्रतिसाद देत दासी कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांना मुंबईला जाण्यासाठी स्वतःचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले.