जिंदालमधील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक कार्यान्वित
इगतपुरी तालुक्यातील मौजे मुंढेगाव शिवारात जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत विस्फोट होवून आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेदरम्यान कंपनीतील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती तालुका आपत्ती नियंत्रण अधिकारी तथा इगतपुरी तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली आहे.
जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत ज्या ठिकाणी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे त्याभागातुन बचाव पथकामार्फत अडकलेल्या एकूण 19 व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपाचारार्थ नाशिक येथील सुयश हॉस्पिटल व ट्रोमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच जखमींपैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असून प्रकृती गंभीर असलेल्या 4 रूग्णांवर रूग्णालयामार्फत उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेदरम्यान कंपनीत उपस्थित असलेल्या परंतु अद्यापही संपर्क न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी संबंधित बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या तपशिलासह इगतपुरी तहसिल कार्यालय
02553-2440009 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही तहसिलदार कासुळे यांनी कळविले आहे.
संपर्कासाठी कार्यान्वित करण्यात आलेले भ्रमणध्वनी क्रमांक
इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण :
8108851212
दुसरीकडे आगीच्या दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात अधिकाऱ्यांची चर्चा झाली. नाशिकच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समिती नेमून या समितीमार्फत या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी घेतला आहे. त्यामूळे अपर जिल्हाधिकारी पारधे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चौकशी केली जाणार आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor