मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (22:16 IST)

कोरोनाबाधितांना मतदानाचा हक्क बजावता येणार

ups madan electin commissioner maharashtra news
कोविड-१९ बाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
 
मदान म्हणाले, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२० रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यात आता मतदानाच्या दृष्टीने अधिक स्पष्टता आणली आहे. कोविडबाधित नसलेले, परंतू प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी ७.३० पासून मतदान करता येईल, असं निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले.
 
मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यांसह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या असल्याचेही मदान यांनी सांगितले आहे.