सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (09:22 IST)

Covid : शाळा आजपासून सुरू, 'हे' 9 महत्त्वाचे नियम जारी

महाराष्ट्रात आजपासून (4 ऑक्टोबर) शाळा सुरू होत आहेत.ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील 8 वी ते 12 वी या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होतील, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
 
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा दीड वर्षांनंतर सुरू होणार असल्यानं एकाचवेळी आनंद आणि काळजी अशा दोन्ही भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसून येतायत.
 
शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला असला, तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं की नाही, यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल, असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय.
यासोबतच, शाळा सुरू करण्यासाठी आणखी कुठले नियम आहेत, कुठली बंधनं आहेत, तसंच, राज्य सरकारनं शाळा, विद्यार्थी आणि पालकांना काय सूचना दिल्यात, याबद्दल आपण जाणून घेऊया.
 
1) पालकांची संमती आवश्यक
शाळा सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली असली, तरी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय की, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल.विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही. एखादा विद्यार्थी काही कारणास्तव शाळेत येऊ शकत नसेल, तर तो घरूनही ऑनलाईन क्लास अटेंड करू शकतो, असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.
 
2) विद्यार्थ्यांनी शाळेत वाहनानं यावं का?
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावं.
ज्या शाळांमध्ये स्कूलबस किंवा खासगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सीटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल, याची दक्षता घ्यावी लागेल.तसंच, विद्यार्थी बसमध्ये चढताना किंवा उतरताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक आणि वाहक यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावं, अशा सूचना देण्यात आल्यात.
 
3) एका बाकावर एकजण आणि कार्यक्रमांवर बंदी
वर्गातही शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्यात. त्यासाठी वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बसवण्याचे आदेश देण्यात आलेत.शाळेत गर्दी होऊ शकेल असे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्यात. प्रार्थना, स्नेहसंमेलन किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करू नये असं सांगण्यात आलंय.शिक्षक-पालक बैठकाही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील.
 
4) दोन सत्रांमध्ये शाळा, जेवणाची सुट्टी नाही
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरवण्यात याव्यात.तसंच, प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक नसावा, असं सांगण्यात आलंय.प्रत्यक्ष वर्गांसाठी जेवणाची सुट्टी नसेल, अशी सूचना देण्यात आलीय.

5) 'शाळांमध्ये क्लिनिक सुरू करावं'
विद्यार्थ्यांचं तापमान नियमितपणे तपासण्यासाठी शक्य असल्यास शाळेतच क्लिनिक सुरू करण्याचं आवाहन राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचनांमधून केलंय. यासाठी डॉक्टर असलेल्या पालकांची मदत घेण्यासही सूचवलंय.सर्व शाळा आरोग्य केंद्राशी जोडाव्या लागतील. तसंच, शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू केल्यास स्थानिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर आणि नर्सची मदत घेता येईल. यासाठी सीएसआर किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्याच्या सूचना देण्यात आलाय.
 
6) मुलांना शाळेत खेळता येईल का?
आताची स्थिती पाहता, कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्यात. मात्र, कोरोनाची स्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत नाही, असंही म्हटलंय.मात्र, खेळ आयोजित करताना काय काळजी घ्यायची, याबाबतही सूचना देण्यात आल्यात.त्यात खेळ खेळताना थकलेल्या, दमलेल्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असावा, विद्यार्थ्यांमध्ये दोन मीटरचं अंतर असावं अशा सूचनांना समावेश आहे.खो-खो, कबड्डी यांसारखे जवळचे संबंध येणारे खेळ टाळून, क्रिकेटसारखे खेळ खेळण्यास हरकत नाही, असंही सांगितलं गेलंय.

7) गृहपाठ ऑनलाईन
विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगावं, अशा सूचना सरकारनं शिक्षकांना दिल्यात. पुस्तकांची अदलाबदल होणार नाही, असा यामागे हेतू आहे.वेळ असल्यास गृहपाठ शक्यतो वर्गांमध्येच करून घ्यावा, असंही सांगण्यात आलंय.तसंच, मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलंय की, जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात.
 
8) शिक्षकांसाठी सूचना
विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याकडे शिक्षकांनी कसं लक्ष द्यावं, याच्या सूचना सरकारनं दिल्यात.
"पहिल्या एक-दोन आठवड्यांमध्ये थेट शिक्षणावर भर न देता, विद्यार्थ्यांना शाळेची सवय होऊ द्यावी, प्रत्येक विद्यार्थ्याची पार्श्वभूमी अवगत करून त्यानुसार विद्यार्थ्यांची परस्पर संवाद साधावा, कोव्हिड होऊ गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे," अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्यात.तसंच, विद्यार्थी आणि पालकांशी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं सातत्यानं शिक्षकांनी संपर्कात राहण्यासही सांगण्यात आलंय.
 
9) शाळेतून घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावं?
शाळेतून घरी परतल्यानंतर थेट स्नानगृहात जाऊन अंघोळ करावी आणि कपडे बदलावे, कपडे धुण्यासाठी टाकावे, अशा सूचना देण्यात आल्यात.शाळांनी विद्यार्थ्यांना यूनिफॉर्मबाबत नियम बांधील न करता, ऐच्छिक करावा, असं सरकारकडून सांगण्यात आलंय.शाळेत वापरावयाचा मास्कसुद्धा साबणाच्या पाण्याने धुवून बाहेर वाळत ठेवावा, असंही सांगितलं गेलंय.
 
दरम्यान, निवासी शाळा संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाहीय, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय.