शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (18:38 IST)

नागालँडमधील चकमकीत गोंदियाचे जवान प्रमोद कापगते यांना वीरमरण

गोंदिया : नागालँडमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडीचे जवान प्रमोद विनायक कापगते यांना वीरमरण आलं आहे. शहीद प्रमोद कापगते हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. 
 
नागालॅंड बॉर्डरवर सकाळी झालेल्या चकमकीत गोळी लागून जवान प्रमोद कापगते शहीद झाले. त्यांच्या मृतदेहावर गुरुवारी मुळगावी परसोडी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. शहीद प्रमोद यांचे पार्थिव सकाळी 8 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या बातमीमुळे परसोडी गावावर शोककळा पसरली आहे. 
 
प्रमोद कापगते हे भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक कापगते यांचे सुपुत्र होते. शहीद प्रमोद कापगते यांचे कुटुंबिय परसोडी इथेच वास्तव्याला आहेत. प्रमोद कापगते हे बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना 2001 मध्ये केंद्रीय राखव पोलीस दलात भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण परसोडीमधील जिल्हा परिषद शाळेत झालं तर महाविद्यालयीन शिक्षण सडक अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयात पूर्ण झाले. मागील 20 वर्षापासून ते सीआरपीएफमध्ये कार्यरत होते.
 
20 वर्षांचा बाँड 15 दिवसांनी पूर्ण होणार होता
त्यांचा सीआरपीएफमधील 20 वर्षांचा बाँड 15 दिवसांनी पूर्ण होत होता. मात्र मंगळवारी सकाळी नागालँड बॉर्डरवर झालेल्या चकमकीत ते गोळी लागून शहीद झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वंदना कापगते, मुलगा कुणाल, भाऊ राजेश कापगते आणि मोठा परिवार आहे.