फोन टॅपिंगप्रकरणी सायबर सेलची प्रश्नावली मिळाली : फडणवीस
फोन टॅपिंगप्रकरणी मला सायबर सेलनं अद्याप साक्षीसाठी बोलावलेलं नाही. मात्र सायबर सेलनं एक प्रश्नावली पाठवली आणि त्यानंतर एक पत्र पाठवल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप महाआघाडीतील नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर केला आहे. त्या प्रकरणातच आज कोर्टात सुनावणी झालीय.
गोपनीय दस्तावेज एसआयटी ऑफिसमधून देवेंद्र फडणवीसांच्या हाती कसे काय आले, याचा तपास मुंबई सायबर करत आहे. एवढे गोपनीय दस्तावेज कसे काय लीक झाले. त्यात वकिलांनी काही फोटोसुद्धा कोर्टात दाखवले असून, देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने डॉक्युमेंट आणि पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांना मिळाले. कोणी तरी एसआयटीच्या ऑफिसमधून दस्तावेज चोरी करून देवेंद्र फडणवीसांना दिलेत, अशी माहिती कोर्टात देण्यात आलीय. या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांना चारदा समन्स बजावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. गोपनीय माहिती देवेंद्र फडणवीसांना राज गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दिली, अशी माहिती मुंबई सायबर सेलच्या वकिलांनी कोर्टात दिलीय. रश्मी शुक्ला त्यावेळी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. तर देवेंद्र फडणवीस या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यांना चार वेळा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. पण ते आले नाहीत, असं मुंबई सायबर सेलच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलंय. कोर्ट २८ डिसेंबरला या प्रकरणात निकाल देणार आहे.