खा. इम्तियाज जलील यांच्याकडून मुस्लिमांची फसवणूक : नवाब मलिक
मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएमने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारच्या काळात मुस्लीम आरक्षणासाठी आवाज उचलला, परंतु आता त्यांचे सरकार आले तरी ते मूग गिळून गप्प बसले आहेत. मुस्लीम आरक्षणावर काहीही बोलायला तयार नाहीत असा आरोप केला होता.
इम्तियाज जलील यांच्या आरोपावरुन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टोला लगावला आहे. मलिक म्हणाले की, इम्तियाज जलील हे पत्रकार होते. तर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर होते. मुस्लिम आरक्षण किंवा मराठा आरक्षण मर्यादेच्या पुढे लागू करता येत नाही. घटना दुरुस्ती केल्याशिवाय कोणाला आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे समाजाला उल्लू बनवण्याच काम हे इम्तियाज जलील करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
आगामी काळात देशाच्या ५ राज्यात निवडणुका होणार आहेत. कोरोनाचा प्रसार पाहता देशात निर्बध लावले जाऊ शकतात. त्यामुळे येणाऱ्या ५ राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा हेतू केंद्राचा असू शकतो ते योग्य होणार नाही. नियम, निर्बंध घालून निवडणूका होऊ शकतात. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करुन सत्ता घेणं त्यांना शक्य होईल. निवडणुका पुढे ढकलल्याने वेगळं संकट निर्माण होऊ शकतं असा आरोप मंत्री नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर केला आहे.
राज्याच्या कॅबिनेटमध्ये कोविडबाबत चर्चा झाली. यामध्ये १८ टक्के रुग्ण दरदिवशी वाढत असल्याचं समोर आलं आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सच्या तज्त्रांची बैठक घेतली आहे. वाढता कोरोना संसर्ग आणि राज्यात वाढत असलेले ओमायक्रोनचे रुग्ण याचा विचार करून राज्यात आज निर्बंध लावले जाऊ शकतात. तिसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे अशी माहिती नवाब मलिकांनी दिली आहे.