अक्कलदाढेचे उपचार करताना एका महिलेचा मृत्य़ू
पंढरपूर तालुक्यातील शिरढोण या ठिकाणी अक्कलदाढेचे उपचार करताना एका महिलेचा मृत्य़ू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टराच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकाकडून करण्यात आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील शिरढोणमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय जयश्री नंदकुमार चव्हाण यांची दाढ दुखत होती. त्रास होत असल्याने त्या पंढरपूरातल्या दातांच्या दवाखान्यात दाढ काढण्यासाठी आल्या होत्या. दाढ काढल्यानंतर त्यांना त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू दातांच्या डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे झाला असल्याचा आरोप मृत्यू झालेल्या महिलेचे पती नंदकुमार चव्हाण यांनी केला आहे.
जयश्री चव्हाण पतीसह दाढ काढण्यासाठी दवाखान्यामध्ये आल्या होत्या. जयश्रीच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, "दाताच्या डॉक्टरांनी जयश्रीला दाढ काढताना भूल दिली होती. त्यानंतर तिला अशक्तपणा जाणवू लागला. यानंतर तिची प्रकृती बिघडत असल्यामुळे तिला सोलापूरमध्ये हलवण्यात आलं. याचदरम्यान तिचा मृत्यू झाला. सोलापूर येथे गेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं."