सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (17:13 IST)

आषाढाशी हितगुज

आषाढ… हा शब्द ऐकताच मनात चित्र उभे राहाते विट्ठल नामाचा गजर करत मैलोनमैल चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचे… 
आपल्या प्रिय पत्नीच्या विरहाने दुखी झालेल्या आणि "आषाढस्य प्रथम दिवसे" मेघासोबत संदेश पाठवणाऱ्या त्या यक्षाचे… 
डोळ्यासमोर अजून एक चित्र उभे राहाते ते ज्येष्ठातील प्रचंड ताप निमुटपणे सोसत आषाढ सुरू होताच पहिल्या पावसाची आतुरतेने वाट बघत असणाऱ्या एखाद्या वृक्षाचे…
 
खरंच, रखरखत्या उन्हानंतर हळुवार पणे ओंजाळणारा गोंजारणारा आषाढमास! 
देवदर्शनासाठी व्याकूळ भक्तांना विठुरायाचे दर्शन घडवणारा आषाढमास! 
प्रियतमेच्या आठवणीत झुरणाऱ्या प्रियकराचे सांत्वन करणारा आषाढमास! 
दु:खी, कष्टी, ओसाड आणि आनंदी, सुखी, हिरव्यागार सृष्टीतील सेतू, म्हणजेच हा आषाढमास! 
 
नकळतपणे कितीतरी गोष्टी शिकवून जातो न..? कधी हितगुज साधून बघा त्याच्या सोबत. खूप छान गोष्टी करतो तो. 
 
नेहमी सांगत असतो की काळ कधीच सारखा नसतो सुखानंतर दुख आणि दु:खानंतर सुख, हे गृहीत धरून चालायला शिकलो की आयुष्य कसं सोप्प सुरळीत होतं बघा! 
 
देवाजवळ नेहमीची, सततची मागणी कशाला?? देव आता झोपणार, तुमची संकटे, तुमचे प्रश्न आता तुम्हीच सोडवा, निदान प्रयत्न तरी करा.

पहिल्या पावसात चिंब भिडणाऱ्या त्या झाडाला बघा. निमूटपणे ऊन, ताप झेलल्यानंतरच त्याच्या जीवनात ओलावा आलाच ना..?? आता त्यावर नवी पालवी फुटणार. ते झाड पुन्हा बहरणार. खात्री ठेवा. 
 
मैलोनमैल चालत जाणाऱ्या त्या वारकऱ्यांचा विश्वास बघा. त्यांनी विट्ठल दर्शनाचा ध्यास घेतला आहे. तहान- भूख- ऊन सारं सारं विसरून ते चालत सुटले आहेत. आधार आहे, तो फक्त भक्तीचा, विठुनामाचा…! 
त्यांचा प्रवास आता संपणार, त्यांच्या आसुसलेल्या डोळ्यांना देवाचे दर्शन घडणार, त्यांच्या कष्टांचे चीज होणार, त्यांचा विश्वास जिंकणार..!! 
 
त्या यक्षालाच बघा ना… चूक घडली आहे त्याच्या हातून.. ती कोणाच्याही कडून घडूच शकते. चुकतो तोच माणूस. आणि चूक घडल्यानंतर त्याचे प्रायश्चित्त करणे हाच एकमेव उपाय. 
त्यासाठी सोसावे लागणारच, भोगावे लागणारच, योग्य वेळ येण्याची वाट बघावी लागणारच. आणि योग्य वेळ आल्यानंतर सुटका पण होणारच! त्यात शंकाच नाही. त्या यक्षाला विरहाचे फक्त एकच वर्ष काढायचे आहे. तो कंटाळला आहे, दुखी आहे.. आणि आषाढाचा मेघ त्याचे सांत्वन करण्यासाठी आला आहे. 
असे कितीतरी दुखी, कष्टी माणसे आपल्या आयुष्यात विखुरलेले आहेत., 
त्यांच्या ही हातून घडली आहे एखादी चूक. 
ते ही काबाडकष्ट करून ध्येयासाठी लढत आहेत.. ध्येय प्राप्तीसाठी झटत आहेत… त्यांच्या ओसाड जीवनात कधी आषाढ मेघ बरसेल ह्याची वाट बघत आहेत.. 
 
चला त्यांच्या आयुष्याचा आषाढाचा पहिला दिवस आपणच होवू या! एखाद्या काळ्याभोर मेघासारखे त्यांच्यावर बरसून त्यांना गारवा देऊ या! एखादा सुंदर बदल घडवून आणू या! आषाढस्य प्रथम दिवसे त्या आषाढाशी हितगुज साधू या. तो खूप काही सांगणार आहे, जरा थांबून ऐकू या. हे जग सुंदर आहेच, ते अजूनही सुंदर करू या!