1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

आषाढी एकादशी व्रत महत्त्व, पूजा विधी आणि कथा

सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. 
 
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात. याचा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो. 
 
या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे. या दिवसापासून चातुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी). 
 
आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. त्यामुळेच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा इथल्या लोकांचा समज आहेत. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो.
 
पंढरपूर आणि काशीविश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्र आहेत जी कधीही नाश पावणार नाहीत असं मानलं जांत. त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्त्व असून दरवर्षी आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात. ही पंरपरा 800 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येतं. 
 
पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बाधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. 83 मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. 516 मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. 1296 मध्ये चालू झाली; तर इ.स. 1650 मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणार्‍या पालखीची प्रथा पाडली.
 
चंद्रभागेच्या वाळवंटा (नदीकाठच्या छोटय़ाशा वाळूचे मैदान) पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद ङ्खरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायर्‍या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला ‘नामदेव पायरी’ म्हणतात. कोपर्‍यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे.
 
या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. 
 
कथा 
भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मरता केवळ एका स्त्री च्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. यावेळी शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.
 
आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे
विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो. 
एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे.
एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावं. 
हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. 
रात्री हरिभजन करत जागरण करावं. 
विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा.
यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात. 
आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावं. 
या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा लाववा. 
 
वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय असून या संप्रदायात वार्षिक, सहमाही जशी दीक्षा घेण्यात आली असेल तशा स्वरूपात वारी काढण्यात येते. पण वारी पायी केली तर शारीरिक तप घडते असाही समज आहे. तसंच सर्व पाप यामुळे निघून जाते असाही समाज आहे. म्हणूनच अत्यंत मनोभावे हे आषाढी एकादशीचे व्रत करण्यात येते.