बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Updated : बुधवार, 15 जून 2022 (14:09 IST)

तुका म्हणे : पंढरीसी जाय। तो विसरे बापमाय।

satn tukaram vitthal
कां हो येथे काळ आला आम्हां आड। तुम्हांपाशी
नाड करावा॥1॥ कांही विचाराचे पडिलें सांकडे॥
का ऐसे कोंडे उपजलें॥2॥ कां हो उपजेना द्यावी 
ऐसी भेटी। का द्वैत पोटीं धरिलें देवा॥3॥ पाप फार  
किंवा झालासी दुर्बळ मागिल ते बळ नाहीं आता॥4॥
का झाले देणें निघाले दिवाळे। कीं बांधलासी बळे
ऋणापायी॥5॥ तुका म्हणे कारे ऐसा केली गोवी।
तुझी माझी ठेवा निवडुनी॥6॥
 
तुकाराम महाराज देवाला म्हणतात की, हे देवा तुला जर माझी भेट देऊन मला मुक्त करायचे नव्हते तर तुझी आणि माझी उपाधीची ठेवण वेगळी करून मला तू संसाराच्या बंधनात का अडकविले?
 
देवा, तुमच्या भेटीसाठी बंधन घालण्याकरिता हा काळ, ही अडचण का आली बरे? मला भेट द्यावी असे तुमच्या मनात का बरे येत नाही? देवा, का बरं असा वैरभाव तुम्ही तुमच्या मनामध्ये धरावा?
 
मला वाटते देवा, बहुतेक माझे पापाचे पारडे फार जड झाले म्हणूनच तुम्ही मला भेटत नाही. का तुमचे बळ कमी झाले आहे? देवा, मला सांगा, तुला कोणाचं देणं झालं का रे? का तुझे सर्व काही संपलं? दिवाळे निघाले. काहीच कळत नाही.
 
देवा, माझ्या आणि तुझ्या भेटीमध्ये हा अडसर कशासाठी रे? हा अडसर कसा संपेल? तुझी नि माझी भेट तरी कशी होणार? माझ्याविषयी काही तुझ्या मनामध्ये असेल तर तो किंतू तरी कधी संपणार? देवा, या सांसारिक बंधनातून मी कधी मुक्त होणार रे? धाव रे देवा. धाव. एकदा भेट तरी.
 
पंढरीसी जा। तो विसरे बापा॥1॥ अवघा
हो पांडुरंग। राहे धरूनिया अंग॥2॥ न लगे धन
मान। देहभावे उदासीन॥3॥ तुका म्हणे मळ। नासी
तात्काळ ते स्थळी॥4॥
 
संत तुकारा महाराज म्हणतात, हे पाहा, जो पंढरीला जातो त्याचं खूप कल्याण तर होतेच, पण त्याला सर्व गोष्टींचा विसर पण पडतो. आता हा विसर पडण्याची पराकोटीएवढी वाढली जाते की, तो आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाही विसरतो. तसेच आपले सगेसोयरे, इष्ट, आप्तेष्ट, घनिष्ट, पाहुणे-रावळे, नात्याच्या लोकांनाही विसरतो आणि घडतं काय, तर हा भक्त अवघ्या  आणि अवघ्या पांडुरंगच होतो. त्याचं जगच पांडुरंगाने व्यापले जाते.
 
अशा भक्ताला कशाचीही गरज, आवश्कता भासत नाही. त्याला ना धनाची अपेक्षा असते ना मानाची अपेक्षा असते. या सर्वांच पलीकडे तो पोहोचलेला असतो. देहभावाविषयी पण तो विरक्त आणि उदासीनच असतो. तो देहादी अनात्म पदार्थांविषयी पण उदासीन असतो. कोणतीच इच्छा, आशा त्याची उरत नाही. याचा अर्थ असाच होतो की, ज्या काही अविेद्येच्या, अज्ञानाच्या अनासक्तीच्या बावी आहेत. त्यांचा विनाश किंवा समाप्ती या पंढरीत होते. नि अवघे पांडुरंगमय जीवन जगण्याचे भाग्यही पंढरपुरी मिळते. म्हणून सर्व नात्यांचा विसर पडतो. आठवतो तो केवळ पांडुरंग, पांडुरंग...
डॉ. नसीम पठाण