शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (08:21 IST)

नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरींच्या नागपूर कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर अज्ञाताने फोन करुन 10 कोटींच्या खंडणीची मागणी करत ही धमकी दिली आहे. धमकीच्या या फोननंतर गडकरींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
 
नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळ गडकरींचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज सकाळी दोन वेळा अज्ञाताने फोन केला. त्यावेळी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने 10 कोटींच्या खंडणीची मागणी करत गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या प्रकारावेळी गडकरी कार्यालयात नव्हते. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती नागपूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ करत तपासाला सुरूवात केली आहे.

यापूर्वीही गडकरींना अशाच प्रकारे कार्यालयात फोन करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 14 जानेवारीला बेळगाव कारागृहातील आरोपी जयेश कांथा उर्फ पुजारी याच्या नावे हे धमकीचे फोन आले होते. आताही त्याच नावे ही धमकी आल्याचे समजते. नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By- Ratnadeep Ranshoor