मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 मे 2022 (14:24 IST)

'संभाजीराजेंना उमेदवारी नाकारणे हा घराण्याचा अपमान नाही' - छत्रपती शाहू महाराज

Shrimant Shahu Maharaj
'संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला नाही,' अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजेंचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शाहू महाराजांची भेट घेतली.
 
ही भेट राजकीय नव्हती, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
 
याआधी, शिवसेनेनी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत येण्याची अट घातली होती. त्यांनी ती अट नाकारली आणि संभाजीराजेंनी म्हटले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यानंतर त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे.
 
वृत्तानुसार, "त्यांची व्यक्तिगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. आमच्यात काही विचारविनिमय झाला असता किंवा मी त्यांना संमती दिली असती किंवा नसती. काही झालं असतं. पण तसा काही विचारविनिमय झाला नसल्यामुळे घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्न येत नाही. हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आले असते तर वेगळा विषय असता. पण तसं काही झालं नाही," असे श्रीमंत शाहू महाराज म्हणाले.
"राज्यसभेवर जाण्याचे जानेवारीपासून त्यांचे प्रयत्न सुरु झाले होते. त्यांची काय योजना होती याची कल्पना काही नव्हती. त्यावेळी देखील चर्चा नाही झाली. पण तिकडे जात असल्याचा निर्णय त्यांनी मला सांगितला. त्याला मी विरोध केला होता पण लोकशाही असल्याने ते कुठेही जाऊ शकतात," असे पुढे शाहू महाराज यांनी म्हटले आहे.
 
संभाजीराजे काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला, अशी टीका माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
 
तसंच, घोडेबाजार टाळण्यासाठी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत. पण ही माघार नसून हा माझा स्वाभिमान आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
 
27 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे म्हणाले, "जे मी बोलणार आहे, ती माझी मुळीच इच्छा नाही. माझ्या तत्वात ते नाही. माझ्या रक्तात ते नाही. पण तरीसुद्धा मला बोलायचं आहे."
 
ते पुढे म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो, जिथं कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, तिथं आपण दोघे जाऊ, मी खोटं बोलत आहे का, असं तुम्ही तिथे सांगावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला आहे."