1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (19:50 IST)

चोरी करायला गेला अन त्याने जीवच गमावला…

- संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात विजेच्या टॉवरवरील विद्युत तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.योगेश रावसाहेब विघे (वय 20, रा. पिलानीवस्ती चिकलठाण, ता. राहुरी) असे मयताचे नाव आहे.
 
यासंदर्भात घारगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशाल राजेंद्र पंडीत (वय 18), आदित्य अनिल सोनवणे (वय 20, दोघेही रा. शिंदोडी ता. संगमनेर),संकेत सुभाष दातीर (वय 26, रा. प्रिंप्रिलौकी ता. संगमनेर) व सरफराज इक्बाल शेख (रा. रामगड ता. श्रीरामपुर) व एक विधीसंघर्षीत बालक अशी आरोपींची नावे आहेत.दरम्यान पोलिसांनी एका कारसह टेम्पोही जप्त केला आहे.
 
याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश रावसाहेब विघे यास विशाल आणि आदित्य हे शिंदोडी येथे घेऊन आले.या सर्वांनी पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान शिंदोंडी शिवारात उच्चदाब विद्युत वाहून नेणार्‍या टॉवरवर टॉवरची उंची जास्त आहे असे माहिती असताना देखील योगेश विघे यास चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने विजेच्या टॉवरवर चढवले.
 
त्यास टॉवरवरील अ‍ॅल्युमिनियम धातुच्या विजेच्या तारा कापण्यास सांगितले. त्याच दरम्यान तारा कापत असताना तार तुटतेवेळी योगेश याच्या पोटास बांधलेल्या दोरीने गळफास बसल्याने योगेशचा मृत्यू झाला.त्यानंतर वरील पाच जणांनी इन्होवा कारमधून योगेशला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना लोणी पोलिसांना वाहनाचा संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली. योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.