मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (21:46 IST)

पत्रकार परिषदेत संजय राऊत कोणत्या मुद्यांवर बोलणार ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आणखी एकदा शिवसेना  भवन इथं पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट द्वारे उद्या अर्थात मंगळवारी सांयकाळी शिवसेना भवन येथे 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलंय. संजय राऊत यांनी यापूर्वी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत भाजप  नेते आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली होती. संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे किरीट सोमय्या हे होतं. 
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारनं त्यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेतील आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आक्रमकपणे आंदोलन करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता. 
 
केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करण्यात येतोय असा दावा करत संजय राऊत यांनी त्यांच्याकडील पुरावे पीएमओकडे दिल्याचं म्हटलं होतं. काही अधिकारी खंडणीचं रॅकेट वसुली एजंटातर्फे चालवत असल्याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत संजय राऊत या मुद्यांवर बोलणार का हे पाहावं लागणार आहे.