बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जुलै 2018 (08:44 IST)

धुळे येथील मृतांना ५ लाख मदत, जमावातील २३ अटकेत

राज्याला हादरवून सोडणाऱ्या धुळे जिल्ह्यातील मारहाण प्रकरणी मृत्यूमुखी पडलेल्या पाचही जणांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावरील ट्रॉलीच्या उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलताना ही मदत जाहीर केली. सोशल मीडीयातील अफवेमुळे काल, १ जुलै रोजी धुळ्यातील राईनपाड्यात मुलं पळवण्याच्या संशयातून पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. गावकऱ्यांनी मिळून त्या संशयीतांना जीव जाईपर्यंत मारले होते. या घटनेमुळे राज्यात हळहळ व्यक्त होत होती. त्याचीच दखल घेत आज मुख्यमंत्र्यांनी त्या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली.राईनपाडा गावात मुलं पळवणारी टोळी शिरल्याची अफवा पसरल्यावर सोलापूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील पाच जणांना गावात जमावानं अमानुष मारहाण केली. त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंत २३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून आणखी काहींची ओळख पटल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या गावकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं रवाना केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर गावात शांतता पसरली असून गावातील पुरुष फरार असल्याचे समजते.