उस्मानाबाद व लोहारा पीक विम्या संदर्भात शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत पाठपुरावा करणार - आ.राणाजगजितसिंह
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मदतीचे आश्वासन
उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१७ मधील सोयाबीन पिकाचा विमा मिळावा यासाठी आ.राणाजगजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आक्रमक लढा व पाठपुरावा सातत्याने सुरुच आहे. दिनांक १७/१०/२०१८ रोजी महसुल, कृषि व मदत आणि पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून पीक कापणी प्रयोगातील त्रुटी, अनियमितता व जिल्हा प्रशासनाकडून योजना राबवताना झालेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच महसूल मंत्री यांनी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनामध्येच विमा देण्याचे मान्य केलेले असताना देखील आजवर यापासून वंचित राहिल्यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यांचा प्रचंड असंतोष व तीव्र भावना त्यांच्या कानी घातल्या.
शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विमा हप्त्यापोटी त्यांना अनुज्ञेय विमा प्रशासनाच्या चुकीमुळे मिळालेला नाही. विमा कंपनी आता विमा देण्यास तयार नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हक्काच्या विम्यापासून शेतकऱ्याना वंचित रहावे लागत आहे. त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष बाब म्हणून पीक विम्यापोटी अनुज्ञेय रक्कम उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी या बैठकीमध्ये आ. पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सर्व मुद्दे विचारात घेवून शेतकऱ्यांची काही चूक नसताना असा अन्याय होवू देणार नाही, विशेष बाब म्हणून मंजूरी नक्की देवू, या शब्दात आ. राणाजगजितसिंह पाटील यांना या बैठकीमध्ये आश्वासित केले व प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले.
पीक विम्या संदर्भात खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मदत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आ. पाटील यांनी व्यक्त केली आहे. या कामी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत राष्ट्रवादीचा पाठपुरावा व शेतकऱ्यांसाठीचा लढा चालूच राहील असे देखील आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगीतले आहे.