आधी शिक्षणातून करिअर...मगचं राजकारणात या - मुख्यमंत्री
शिक्षणानेच माणूस घडतो. शिक्षणातून संस्कार मिळतात..... जीवनात निर्भिडपणे उभे राहण्याचा प्रयत्न करा... आधी शिक्षणातून करिअर करा. मग राजकारणात या.." अशी दिलखुलास उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आयुष्यातील पहिला विमान प्रवास करून मुंबईत पोहचले. राज्यातील आयएसओ मानांकन प्राप्त शाळा असा लौकिक असलेल्या या शाळेतल्या या चिमुकल्यांना थेट मुख्यमंत्र्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने विधान भवनाच्या समिती सभागृहात या चिमुकल्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची अनौपचारिक मुलाखत घेतली
तुम्ही पहिल्यांदा विमानातून प्रवास कधी केला? तुम्हाला भीती नाही वाटली?.. शालेय जीवनातील मजेशीर किस्से..सांगा. इथपासून ते "सर, शहर स्मार्ट करताय, मग आमच्या गावांचं काय? ..आम्ही राजकारणात यावे काय?..आम्ही शिकू पण, नोकऱ्या मिळतील काय?.. दुष्काळासाठी काय मदत करत आहात? ऊसतोड मजुरांसाठी काय योजना आहेत?"अशा संवेदनशील प्रश्नांनासुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चिमुकल्यांना दिलखुलास उत्तरे देत मार्गदर्शनही केले.