गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (08:11 IST)

अधिवेशन दिवस असा गाजला, हिरेन मृत्यू खा. डेलकर, अन्वय नाईक आत्महत्यावरुन

मनसुख हिरेन यांच्या मृत्युमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप खासदार डेलकर, अन्वय नाईक या आत्महत्यांनी राजकारण ढवळून निघाले आहे. एकमेकांवर आरोप करणाऱ्या महाआघाडी सरकार व विरोधकांनी विधीमंडळ अधिवेशानातील मंगळवारचा दिवस गोंधळातच वाया घालविला. सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करुन नंतर दिवसभरासाठी तहकूब केले गेले. 
 
गृहमंत्री अनिल देशमुख व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. देशमुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती देत होते. दादरा नगर हवेलीचे खा. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. फडणवीस यांनी यावरून सरकारला धारेवर धरले.
 
गृहमंत्री म्हणाले, डेलकर पाच वेळा दादरा नगर हवेलीचे खासदार राहिले. त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचे नाव आहे. मी मुंबईत आत्महत्या करीत आहे. कारण मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा डेलकर यांनी चिठ्ठीत व्यक्त केली आहे.
 
देशमुख डेलकर प्रकरणाची माहिती देत असताना, देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरण उपस्थित केले. त्यामुळे डेलकर प्रकरण मागे राहिले. फडणवीस म्हणाले, पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात पुरावे असताना त्यांना का पाठिशी घातले जातं आहे. सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करीत आहे, असे प्रश्न उपस्थित केले. वाझे यांचे निलंबन झाले असताना, त्यांनी एका पक्षात प्रवेश केला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले, असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केले.