देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री होतील असं सांगत होते, तर तेव्हाच आक्षेप का नाही घेतला?
विरोधी पक्षात कोण बसत आहे यावर इतका गोंधळ मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेला नाही असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनेची युती तुटण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मुद्द्यावरही भाष्य केलं. भाजपा-शिवसेना युतीमध्ये १९८९ साली मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्यूला ठरला होता याची आठवणही त्यांनी करुन दिली.
“तुम्ही युती, आघाडी करुन निवडणुका लढवता, आश्वासनं देता आणि मतदार दोन-दोन तास उभं राहून मतदान करतात. ते केल्यानंतर निकाल लागतो तेव्हा कोणी सकाळी जाऊन राज्यपालांकडे शपथविधी करतं. मग भाजपा, राष्ट्रवादी एकत्र येतात. दोन तासात फिस्कटतं, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतात. मला ही गोष्ट कळलेलीच नाही,” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
“जर त्यावेळी उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदी, अमित शाह हे देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री होतील असं सांगत होते, तर तेव्हाच आक्षेप का नाही घेतला? निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि मग यांना आठवलं. लोकांनी काय फक्त खेळ पाहत राहायचं का? दोन तास रांगेत, उन्हात उभं राहून मतदान करायचं आणि हे वाटेल तशी प्रतारणा करणार. त्यामुळे हा प्रश्न फक्त विदर्भापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राचा आहे. ज्या लोकांनी मतदान केलं आहे, त्यांचा अपमान केला आहे. या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर घेऊन जाणं महत्त्वाचं आहे”.