शेतकरी संकटात असताना वीजबिलाची सक्तीने वसुली म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार - धनंजय मुंडे
राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आधीच संकटात असताना त्यांना आधार देण्याऐवजी, मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांकडून वीजबिलाची थकबाकी सक्तीने वसूल करण्याचे आदेश कसे काय देता, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला आहे. सरकारची ही कृृती म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यासह राज्यातील सर्वच भागात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे गेली आहेत. अशावेळी उपलब्ध थोड्याशा शेतातील पाण्यावर पिके जगवण्याची शेतकऱ्यांना शेवटची आशा उरली आहे.
शेतकरी ही पिके जगवण्याचा प्रयत्न करत असतानाच महावितरणने एक पत्रक काढून त्यांच्याकडील कृषी पंपाची, विजेची थकबाकी ३ हजार रूपये, ५ हजार रूपये याप्रमाणे वसुली करण्याचे आदेश काढले असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
महावितरणच्या संचालकांनी १९ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंत्यांना एक पत्र पाठवून शेतकऱ्यांकडील वीजबिलाची वसुली करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. सदर आदेश हे मा. उर्जामंत्र्यांसोबत १८ ऑगस्ट रोजी झालेल्या एका बैठकीनुसार काढण्यात आल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
शासनाच्या या सक्तीच्या सावकारी वसुलीबाबत धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. दुष्काळ जाहीर करून त्यांना वेगवेगळी मदत देणे आवश्यक असतानाच महावितरण सक्तीने वसुली कशी करू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हजारो, कोट्यावधी रूपये घेऊन उद्योगपती पळून जात असताना ते सरकारला दिसत नाहीत आणि शेतकऱ्यांकडील पाच, दहा हजार रूपयांची वसुली करण्याचेच कसे काय सुचते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांजवळ आज तीन हजार रूपयेच काय एक रूपयाही भरण्यासाठी पैसे नाहीत. मागील काळातील नुकसानीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही, फसवी कर्जमाफी केली, पीक विमा मिळत नाही, महागाईमुळे ही शेतकरी त्रस्त झाला आहे, पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही. चारही बाजूंनी शेतकरी संकटात सापडला असताना महावितरणची ही सावकारी, जुलमी वसुली असल्याची टीका करून हे पत्रक तातडीने मागे घ्यावे, शेतकऱ्यांकडील सक्तीची वीजबिल वसुली केवळ थांबवावी नव्हे तर त्यांचे वीजबिल माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.