बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 जानेवारी 2024 (09:17 IST)

महायुतीच्या मेळाव्यात मतभेद चव्हाट्यावर

ajit panwar
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या पुढाकारातून  जिल्ह्या-जिल्ह्यांत मेळावे पार पडले. या मेळाव्यातून महायुतीच्या स्थानिक नेत्यांत मनोमिलन हाच मुख्य उद्देश होता. मात्र, या मेळाव्यातून महायुतीतील मनोमिलनापेक्षा मतभेदाचीच चर्चा अधिक रंगली. रायगड जिल्ह्यात तिन्ही पक्षांत नाराजीनाट्य दिसून आले. नगरमध्ये अजित पवार गटाचे नेते अनुपस्थित राहिले, तर नाशिकमध्ये छगन भुजबळांनी मेळाव्याकडे पाठ फिरविली.
 
जळगावात थेट शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपला सुनावले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात सर्वच पक्ष कामाला लागले असून, महायुतीच्या नेत्यांनी आज जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीचे मेळावे घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गट सामिल झाल्याने महायुती अधिक मजबूत झाल्याचा संदेश पोचविण्याचा प्रयत्नही केला गेला. एकूणच महायुतीच्या नेत्यांमध्ये मनोमिलन व्हावे, या उद्देशाने हे मेळावे पार पडले. सर्वच मेळाव्यांतून महायुतीचा एकजुटीचा संदेशही दिला गेला. परंतु मनोमिलनापेक्षा नाराजीचीच अधिक चर्चा झाली.

Edited by -Ratnadeep Ranshoor