शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (10:32 IST)

खा.युवराज संभाजीराजे छत्रपती आणि छगन भुजबळ यांच्यात चर्चा; भेटीनंतर केला हा खुलासा

Sambhaji Chhatrapati
छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची निर्मिती करून आरक्षण दिले. छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं आहे. मी त्यांचा वंशज असून त्यांनी केलेलं काम पुढे अविरत सुरु ठेऊन बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचे माझे प्रयत्न आहे. मी जरी वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ यांनी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला असून ते त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे प्रतिपादन खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज केले. तर बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही एकमेकांना ताकद देऊ असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
 
खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दिलखुलास पणे चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, करण गायकर, योगेश निसाळ, विलास पांगरकर, समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पत्रकारांशी संवाद साधतांना खा.युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, नाशिक येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली होती. त्यावेळी घरी येणार अस मी त्यांना सांगितलं होत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून भेट झाली नाही. आज नाशिक येथे कार्यक्रमानिमित्त आलो असता त्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा जुना संबंध आहे. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला त्यांनी मोठी मदत केली होती. तसेच पिंपळगाव बसवंत येथील सत्यशोधक चळवळीत काम करणारे सत्यशोधक गणपतराव मोरे यांना त्यांच्या कामाबद्दल अधिक बळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.६ मे रोजी असलेल्या स्मृती शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दल आमची चर्चा झाली असून या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी ही संधी असून त्यादृष्टीने आमच्याकडून संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी जरी छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पहिल्यापासूनच समाजात रुजवीत असून ते त्यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी हा कुठलाही वाद नाही बहुजन समाजासाठी आपला लढा आहे. फार थोडे लोक असा वाद करतात त्याला आपला विरोध आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी निमंत्रण दिले होते. मात्र अनेक दिवसांपासून भेट होऊ शकली नाही. आज त्यांची भेट झाली याचा विशेष आनंद आहे. भेटीमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याशी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी खूप चर्चा झाली. छत्रपती शाहू महाराज हे आमचे देव असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही काम करत आहोत. दि.६ मे रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभर अखिल भारतीय महात्मा फुल समता परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देखील राज्यभर कार्यक्रम घेण्याबाबत खासदार शरदचंद्र पवार साहेबांशी चर्चा करून कार्यक्रम राबविण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
ते म्हणाले की, सत्यशोधक समाजाच्या लोकांना शाहू महाराजांनी मोठ पाठबळ दिल व मदत केली. समाजातील वंचित घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यामुळे बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही एकमेकांना ताकद देणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, मराठा ओबीसी असा कुठलाही वाद नसून ओबीसी आरक्षणास कुठल्याही लोकप्रतिनिधीने विरोध केलेला नाही. काही विघातक प्रवृत्ती केवळ निवडणुकीच्या वेळेस ओबीसी मराठा वाद पसरविण्याचा प्रयत्न करतात. त्याला जनता बळी पडणार नाही. सद्या देशभरात जे वातावरण आहे, त्याबद्दल वेगळं सांगायला नको असे सांगत फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार देशाला या दलदलीतून वाचवू शकतात असे त्यांनी यावेळी सांगितले.