बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

'डान्सबार'वरील बंदी उठणे, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस

डान्सबारला पुन्हा परवानगी मिळणे हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे अशी तीव्र प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटिलने दिली आहे. राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू चांगल्या रित्या मांडली नाही म्हणून अशी वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
राज्यातील गुन्हेगारीला आळा बसावा, तरुण पिढीला चुकीच्या मार्गाला जाण्यापासून वाचवण्यासाठी आर आर पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. तसेच महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि राज्याचे आपले सांस्कृतिक महत्त्व आहे, मात्र पुन्हा डान्सबार सुरू करण्यास संमती मिळणे बाब खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले.
 
राज्यात डान्सबारवर घालण्यात आलेली अनेक बंधने सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातले डान्सबार खुलेआम सुरू होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे डान्सबार चालक आणि बारबालांना दिलासा मिळाला आहे. रात्री 11.30 पर्यंत डान्स बार सुरू राहणार आहेत. बारबालांना टीप न देण्याची अट आणि सीसीटीव्ही लावण्याचा नियमही शिथिल करण्यात आला आहे. बारमध्ये आता दारू विक्री करता येणार आहे. शाळा आणि धार्मिक स्थळांपासून एक किलोमीटर अंतरावरील डान्सबार बंदीची अट रद्द केलीय. शिवाय ऑर्केस्ट्रा सुरू करण्यासही परवानगी दिली आहे.
 
उल्लेखनीय आहे की डान्स बारवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने बंदी घालण्यात आली होती. समाजाच्या भल्यासाठी डान्स बार वर बंदी घालण्यात आली होती सुप्रीम कोर्टात सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं अशी टीका स्मिता पाटील यांनी केली आहे. दरम्यान, आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत, डान्सबार सुरू होऊ नये यासाठी पावले उचलण्याची विनंती करणार असल्याचे स्मिता पाटील यांनी म्हटले आहे.