शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (15:31 IST)

शहरात तुमचा गोठा किंवा तबेला आहे? …तर तुम्हाला होऊ शकतो कारावास

Nashik mahapalika
नाशिक महापालिका क्षेत्रातील शहर परिसरातील गोठे व तबेले धारकांना 2022-2023 वर्षा करीता परवाना नुतनीकरण व नवीन परवाना काढण्यासाठी 1 ते 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रातील सर्व गोठे धारकांनी परवाना नुतनीकरण व विनापरवाना गोठे धारकांनी नवीन परवाने काढून घ्यावेत, असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, वाय. आर. नागरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील नाशिक शहर परिसरासह गंगापुर, आनंदवल्ली, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, मानूर, वडनेरदुमाला, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डी वडाळा (शिवार), त्र्यंबक खुर्द, कामटवाडे, चुंचाळे, पिंपळगाव बहुला या भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच विना परवाना अथवा विना अनुज्ञाप्ती गुरे बाळगणे यासाठी रुपये 2 हजार पर्यंत दंड व ३ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षेची तरतुद करण्यात आली असल्याचेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
 
राज्य शासनाच्या अधिसुचनेद्वारे नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी महाराष्ट्र नागरी क्षेत्रामध्ये गुरे पाळणे आणि त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम १९७६ हा कायदा लागू केला आहे. या कायद्यान्वये विना परवाना गुरे पाळणे, गुरांची ने आण करणे गुन्हा असल्याने, महानगरपालिका क्षेत्रातील गोठे आणि तबेले धारकांनी 30 एप्रिल 2022 पर्यंत दिलेल्या मुदतीत परवाना नूतनीकरण न केल्यास प्रती जनावर 5 रुपये इतके विलंब शुल्क आकारण्यात येईल याची गोठे व तबेले धारकांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, वाय. आर. नागरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकांन्वये सांगितले आहे.परवाना नूतनीकरण व नवीन परवाना काढणे याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय शासकीय दुध योजना आवार, त्र्यंबक रोड, नाशिक 422002 या पत्यावर अथवा 9552621893 या भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, वाय. आर. नागरे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.