शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 डिसेंबर 2018 (09:43 IST)

सरकार निवडणुकांसाठी निर्णय घेते आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा सवाल

तेलंगणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एका घटकाला आरक्षण देण्याबाबत आक्षेप घेताना, घटनेनुसार ५० टक्क्यांवर आरक्षण देता येतच नाही, असे जाहीररीत्या सांगितले होते. मात्र, महाराष्ट्रातील भाजप सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर करून ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपा सरकारने घेतलेला हा निर्णय निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तर घेतलेला नाही ना, असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार  यांनी केला. 'संविधान बचाव देश बचाव' या महिला आंदोलनाच्या रोहा येथील समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
 
या कार्यक्रमात शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले. देशातील, न्यायालयीन प्रक्रिया, बँकांसह अनेक स्वायत्त संस्थांच्या कामकाजात सरकार हस्तक्षेप करत आहे. कर्नाटकातील भाजपाच्या एका मंत्र्याने संविधानाबाबत आक्षेपार्ह उद् गार काढून घटनेचा अवमान केला. त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून ताबडतोब काढायला पाहिजे होते, परंतु त्याला फक्त शब्द मागे घेण्यास सांगण्यात आले. मंत्रिपदाची शपथ घेताना १०० टक्के संविधानाप्रमाणे वागू, अशी शपथ घेतली जाते. मात्र भाजपचे मंत्री संविधानाचा अपमान करत आहेत. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचाच संविधानावर विश्वास नाही असे चित्र दिसते आहे. संधी मिळेल तेव्हा संविधानाचे उल्लंघन करत समाजात तेढ निर्माण केली जाते आहे. परंतु आम्ही तसे कदापि होऊ देणार नाही. सरकार बदलू परंतु संविधान बदलू देणार नाही, असा इशाराच पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
 
राम मंदिर प्रकरणावर पवार म्हणाले की मंदिर बांधण्यास आमचा विरोध नाही, परंतु अयोध्येतील राम मंदिराच्या आवारातील लोकांना हटवून बेघर करणे म्हणजे प्रभू रामाचा अपमानच. तेथील गरीब जनतेलाही रामाप्रमाणेच वनवासाला जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. डॉ. आंबेडकर यांनी मोठा प्रयास करून देशाला घटना दिली. त्यात सर्वधर्मीय तसेच महिला-उपेक्षितांना संरक्षण, न्याय्य हक्क मिळावा हे नमूद केले आहे. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. डॉ. आंबेडकर यांच्याकडे दूरदृष्टी होती. ते विचारवंत, उत्तम व्यक्तिमत्व आणि कर्तृत्ववान व्यक्ती होते. त्यांनी कामगारांसाठी कायदे केले, पाण्याची व्यवस्था व्हावी, विद्युत पुरवठा व्हावा, यासाठी भाकरा-नांगलसारखी मोठी धरणे बांधली. डॉ. आंबेडकर यांनी न्याय्य हक्क मिळवून दिलेल्या महिलांनीच हातात पेटती मशाल घेतली आहे. त्या मशालीने या महिला दुष्ट प्रवृत्तींचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाहीत.
 
हिंदवी स्वराज स्थापन झालेल्या या रायगड जिल्ह्यात महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. माजी केंदीय अर्थमंत्री डॉ. सी. डी. देशमुख, नानासाहेब कुंटे यांचा हा रायगड जिल्हा आहे, याचा सर्वांना अभिमान आहे, असेही ते म्हणाले.