रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (09:41 IST)

MPSC परीक्षेत 'राजकारण' आणू नका, एका आठवड्यात तारीख निश्चित होईल..

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही 'राजकारण' करु नये, कृपया अशा लोकांना विद्यार्थ्यांनी बळी पडू नका. कोणी भडकवत असेल तर भडकू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एका आठवड्यातच या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.
 
महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला होणार होती. मात्र कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली असल्याने आता ती २१ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र ही तारीख राज्य लोकसेवा आयोगामार्फत जाहीर केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी परीक्षा पुढे ढकलत आहोत. शुक्रवारी आयोगामार्फत ही तारीख जाहीर केली जाणार आणि ही तारीख येत्या आठवड्याभरातच होईल.
 
'जो कर्मचारी वर्ग परीक्षेच्या कामाला लागणार होता, तो सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्या कामी लागला आहे. परीक्षार्थींनी आपली तयारी ठेवावी, 
येत्या ८ दिवसांत परीक्षा होणार,' असे आश्वासन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिले. परीक्षा लांबणीवर पडल्याचे कळताच हजारोंच्या संख्येने उमेदवार रस्त्यावर उतरले. पुण्यातून उद्रेकाला सुरूवात झाली. तेथे उमेदवारांनी रास्ता रोको केला. त्यानंतर कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, सांगली, जळगाव येथेही उमेदवारांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या सरकारच्या निर्णया विरोधात आंदोलन सुरू केले.
 
सरकारला घरचा आहेर
सत्ताधारी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
 
वयाची मर्यादा आडवी येणार नाही
एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा लांबणीवर पडली म्हणून वयाची मर्यादा आडवी येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी उमेदवारांना दिली आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे ते म्हणाले.