नाशिककरांनो काळजी करू नका वटवृक्ष वाचला आहे या शब्दात आदित्य ठाकरे यानी दिली ग्वाही
नाशिककरांनो काळजी करू नका झाड वाचलं आहे, अशी भावनिक साद घालत, जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौक येथील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.तिडके नगर येथील उंटवाडी म्हसोबा महाराज देवस्थानभोवती दोनशे वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाच्या पाहणी प्रसंगी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, तिडके नगर येथील उंटवाडी म्हसोबा महाराज देवस्थानाभोवती असलेला वटवृक्ष हा अंदाजे दोनशे वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. अशा प्राचीन वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने हा महावृक्ष वाचवून उड्डाण पुलाची रचना केली जाईल. तसेच शंभर वर्षांपूर्वीची सर्व झाडे वाचली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार करूनच शाश्वत विकास कामांवर भर देण्यात येईल असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, नाशिक शहरातील इतरही झाडे वाचविण्यासाठी महानगरपालिकेच्या नवीन आराखड्यात नियोजन करण्यात येईल. नंदिनी नदीची संपूर्ण पाहणी करत असताना औरंगाबादच्या धर्तीवर लोकसहभागातून नंदिनी नदीची स्वच्छता झाल्याची करण्यात येईल असे सांगितले.