सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:16 IST)

मग हॅकरने केलेले आरोप कसे खरे वाटले : खडसे

अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजा याने ईव्हीएम मशीनच्या हॅकिंगबाबत गोपीनाथ मुंडे यांना माहिती असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. यामुळे भाजपातील नेते हॅकर खोटारडे असतात, त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, असे म्हणत आहेत. मात्र, माझ्या बाबतीत हॅकर मनीष भंगाळे यांने थेट दाऊदशी संबंध जोडले, त्याच्या बोलण्यावर कसा विश्‍वास ठेवला? असा प्रश्‍न माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. फैजपूर येथे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्‍तव्यामुळे भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे. 
 
आ. खडसे म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीनच्या माहितीमुळे झाली असल्याचा दावा हॅकर सय्यद शुजा याने केला.  त्यानंतर भाजपाने हॅकर हे खोटारडे असल्याने त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, माझ्या बाबतीत हॅकरने केलेले आरोप कसे खरे वाटले. तसेच या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाअंती हा दावा खोटा ठरला. 
 
मुंडे यांच्याबाबत हॅकरला खोटे ठरविणार्‍यांना माझ्याबाबत कसे खरे वाटले? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. माझ्यावर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला पदाचा राजीनामा द्यावा लागला. अशा मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.